।। स्वस्तिक पुराण ।।

स्वस्तिक हा शब्द आस्तिक आणि नास्तिक या दोन शब्दांमध्ये चपखल बसतो. ‘असणे’ या शब्दापासून ‘असती’ हा शब्द तर असती पासून न+असती म्हणजे नसती आणि स्व +असती स्वस्ति हे शब्द तयार झाले. या असती पासूनच आस्तिक हा सकारात्मक तर नास्तिक हा नकारात्मक शब्द तयार झाला आणि स्वस्तिक हा सकारात्मकतेच्या पुढे जाऊ पाहणारा शब्द तयार झाला.

‘असणे’ हा शब्द भाषेच्या आरंभीच्या स्वरूपात अस्तित्वात येणे, हे स्वभाविक आहे. कारण ‘असणे’ हा शब्द ज्ञानाच्या शोध परंपरेतील आद्य शब्द भासतो. नसणे हा त्याचा एक पर्यायी शब्द असल्याने तो ही भाषेच्या आद्य परंपरेतील शब्द होय.

या कोणीतरी आहे तिथे ! वा तिथे कोणीच नाही ! या जिज्ञासेतून जेव्हा सर्वशक्तिमान ईश्वर संकल्पनेचा शोध घेतला जाऊ लागला तेव्हा त्यातून आस्तिक आणि नास्तिक परंपरांचा जन्म झाला. या आस्तिक आणि नास्तिक परंपरेच्या जिज्ञासेपोटी शोध घेणारा सर्वशक्तिमान ‘स्व’ तुन स्वस्तिक शब्दाचा जन्म झाला.

शंकराची पिंड म्हणून ओळखले जाणारे लिंग आणि योनी ही प्रतीके पाच हजार वर्षांहूनही प्राचीन अशा सिंधु संस्कृतीतील शहरांच्या उत्खननात सापडली. तितक्याच किंवा त्याहून ही अधिक मोठ्या प्रमाणात तत्कालीन मेसोपोटेमियातील अक्कड वगैरे संस्कृतीत स्वस्तिक हे चिन्ह सापडले आहे.

उभ्या रेषेला मधोमध छेदणारी तितक्याच लांबीची रेषा आणि या दोन रेषांच्या टोकाला घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने जोडलेल्या चार रेषा वा बाहू हे भारतीय बहुधार्मिक स्वस्तिकाचे स्वरूप.

घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेकडे बाहू असलेले ‘उलटे स्वस्तिक’ हे हिटलरने त्याच्या नाझी पक्षाचे प्रतीक बनवल्याने त्याला ज्यूंवरील नाझी हिंसाचारामुळे नकारात्मक रूप मिळाले.

ख्रिश्चन धर्मियांतील येशू ख्रिस्ताला मरणान्मुख अवस्थेतला क्रॉस देखील स्वस्तिक म्हणून ओळखला जातो.

अमेरिकेसारख्या काही शतके आधी जन्मलेल्या देशातही अन्य धर्मीय परंपरांमुळे स्वस्तिक चिन्हाचे उदात्तीकरण होऊन, ते सर्वप्रचलित झाले आहे.

हिंदू धर्मीय गणपती देवतेच्या आराधनेसाठी पठण केल्या जाणाऱ्या अथर्वशीर्ष या स्तोत्राच्या आरंभी स्वस्ति मंत्र म्हटला जातो. हा मंत्र मूलतः ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातील ८९ व्या सुक्तातील ६ वा मंत्र आहे. तो असा :

स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा: स्वस्ति न पूषा विश्ववेदा: |

स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: स्वस्ति नो बृहस्पति र्दधातु ||

यात इंद्रासारखं वृद्धत्व, पुषा देवतेसारखं विश्ववेदाचे ज्ञान, अरिष्टनेमी सारखी संकटावर मात करण्याची शक्ती आणि बृहत् स्वरूप प्राप्त करण्याची आकांक्षा ‘स्वस्ति’ म्हणजे स्वतः मध्ये गृहीत धरली आहे.

स्वस्तिकाच्या चार भुजातील पहिली भुजा वृद्धी अर्थात वय, संपत्ती, मानमरातब यांची वाढ दर्शविते. दुसरी भुजा विश्ववेदाचे ज्ञान दर्शविते. तिसरी भुजा अरिष्टनेमी ही स्वतःवर आलेल्या अरिष्टावर मात करण्याची ताकद दाखविते. तर चवथी भुजा ही बृहस्पती सम नवनवीन ठिकाणी बिऱ्हाड टाकण्याची म्हणजे प्रसरण पावण्याची प्रेरणा देते.

अशाप्रकारे प्रत्येक प्राणिमात्रांच्या अंगभूत जीवन प्रेरणा हे स्वस्तिक चिन्ह दाखविते.

अमिबा या एकपेशीय प्राण्यापासून शेवाळासारख्या आद्य वनस्पतीपर्यंत ते अगदी मानवासारख्या व्यामिश्र प्राण्यापासून ते आपली मधुर फळे चिमण्यापाखरांना खाऊ घालून आपली बीजे सर्वदूर पसरवणाऱ्या वटवृक्षापर्यंत प्रत्येक जीव हा अंगापिंडाने वाढत असतो. ज्ञानप्राप्ती करत असतो. स्वतःचे संरक्षण करत असतो आणि आपले प्रभाव क्षेत्र वाढवून स्वतःला उदात्त बनवत असतो.

यामुळे जीवनाच्या असण्या आणि नसण्यामध्ये स्वस्तिक सामावलेला आहे. हाच प्रत्येक प्राणिमात्राचा स्वस्तिक धर्म होय.

Comments

Leave a Reply

Discover more from Swastika Dharma

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading