केंद्र सरकारी नोकरीत मराठी टक्का तसा कमीच, तरीही एखाद्या विभागात काम करताना सोबतीला कोकणातील अधिकारी असतील तर अडचणीत भर. कारण गणपती आणि होळीला सुट्टी कोणी घ्यायची याची समस्या. मग कुठेतरी तडजोड किंवा ऑफिसमध्ये या सणासुदींना कर्मचार्यांची टंचाई.
गणपती आणि होळीच्या सणाला कोकणी माणसाच्या गावी जाण्याच्या संवेदना या त्याच्या वीर आणि अवीर बनण्याच्या प्राचीन प्रेरणा आहेत. खरतंर हा एक लोकजीवनशास्त्रीय पुरातत्वाचा विषय आहे.
प्रत्येक जीव हा आपल्या जगण्याच्या मर्यादा वाढवित असतो आणि त्यातच त्याच्या जीवनाची यशस्विता दडलेली असते. वाघासारखा सहसा एकटा शिकार करणारा प्राणी असो वा सिंह, माकड वा कुत्र्यासारखा समुहाने राहणारे प्राणी, त्यांना आपल्या अन्नविषयक गरजा भागविण्यासाठी आपल्या भौगोलिक सीमा सतत वाढवित रहावे लागते. तरुण प्राण्यांना कधीकधी कळप सोडून स्वतःचा परिघ वा स्वतःचा कळप तयार करावा लागतो. सीमांचे रक्षण करावे लागते, प्रसंगी त्यासाठी इतर प्राण्यांशी हिंस्त्र सामनाही करावा लागतो.
यशस्वी जगण्यासाठी भौगोलिक परीघ वाढविणे यालाच प्राचीनकाळी कोकण प्रांतात वीरत्व समजले जात होते. कोकणी माणसाने वीरांची ही संवेदना आपल्या धमन्यांमध्ये भरली आहे.
अश्विन शुध्द नवमीला गावागावातल्या उत्तर दिशेच्या सीमांवरील भावई वा भैरव देवतांपाशी थारावायचं म्हणजे जमा व्हायचे. यत् + ज्ञ म्हणजे इथे ज्ञानाची शिदोरी उघडून ज्ञानपरंपरेचा ठेवा वाटत सोबतीला स्नेह भोजन करायचं आणि दुसर्या दिवशी अश्विन शुध्द दशमीला म्हणजे दसर्याला सोनं वाटून, हात पाय पसरायचे म्हणजे अष्ट दिशांमधल्या आपआपल्या बिर्हाडांच्या दिशेने सीमोल्लंघन करीत प्रयाण करायचे.
पुढे सहा महिन्यांनी फाल्गुन महिन्याच्या दरम्याने पुन्हा अवीर बनून आपआपल्या मुळगावी परतायचं आणि फाल्गुन पौर्णिमेला बिर्हांडांतील आपआपल्या अनुभवांच्या यशस्वितेचा ज्ञानयज्ञ मांडायचा.
गुढी पाडव्याला आपल्याला यशस्वी आगमनाची वर्दी देणारी गुढी उभारून नव वर्ष साजरे करायचे.
अक्षय तृतीयेला बीजांच पुजन करायचं.
खरीपाच्या हंगामातील मृग नक्षत्रावर पेरलेल्या बियाणांना भाद्रपद महिन्यात आकार येवू लागला की पुन्हा सीमोल्लंघनाची तयारी करायची.
प्राचीन काळातील हा अश्विन शुध्द दशमी ते फाल्गुन पौर्णिमा हा वीर आणि अवीर बनण्याचा कालावधी, इतिहास काळात आवरता घ्यावा लागला. इतिहासकाळात सीमोल्लंघन करणारे वीर हे फाल्गुन महिन्याच्या ऐवजी शेतीच्या कामासाठी मृग नक्षत्राला अवीर म्हणून परतून पीकपाणी आकाराला आलं की अश्विन महिन्यात सीमोल्लंघन करीत.
आधुनिक काळात जागतिकीकरणामुळे कामकाजाचे बदललेले स्वरुप, सत्वर आणि सुखरुप प्रवास करण्याच्या सुविधा यामुळे वीर आणि अवीर बनण्याच्या प्रेरणांना अधिकच आवरतं घ्याव लागलं. आता चाकरमानी गावाला होळीला अवीर म्हणून फेरी मारतो. गौरी-गणपतीच्या सणानिमित्त पुन्हा गावी फेरी मारून आपआपल्या बिर्हाडांना वीर बनून परततो.
कोकणी लोकांच्या जीवनात प्राचीन काळापासून प्रवाहगत असलेलं आणि काळानुरुप बदलत जाणारं हे शास्त्रीय पुरातत्व आहे.
तर्कशास्त्रीय साम्यानुगम म्हणजे Analytical Reasoning चा वापर केला आणि इतिहासाचे भावनिक उत्खनन केले की या संवेदना आपल्या मनामध्ये आकाराला येतात.
लोकजीवन शास्त्र (Ethnology) ही मानववंश शास्त्र म्हणजे Anthropology च्या सांस्कृतिक विभागातील एक शाखा आहे. पुरातत्व विद्या (Archeology) आणि भाषा शास्त्र (Linguistics) या सांस्कृतिक विभागाच्या इतर शाखा होत.
पुरातत्व विद्येचे कार्य हे उत्खननात मिळालेल्या वस्तूंचा अर्थ लावणे हे आहे तर लोकजीवनाचा सर्वांगीण व सर्वव्यापी अभ्यास हे लोकजीवनशास्त्राचे कार्य आहे.
उत्खननांच्या भौगोलिक व आर्थिक मर्यादा लक्षात घेवून पुरातत्व विद्या (Archeology) व लोकजीवन शास्त्र (Ethonology) यांच्या एकत्रीकरणातून तज्ञांनी लोकजीवनशास्त्रीय पुरातत्व विद्येला (Ethno-archeology) जन्मास घातले.
लोकजीवन शास्त्रीय पुरातत्वामध्ये विशिष्ट पुरातत्वीय समस्यांची उकल करणे हा विचार असतो. तर्कशास्त्रीय साम्यानुगम (Analytical Reasoning) या पद्धतीवर समकालीन लोकसमुहांमधील भौतिक घटकांचे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय निरीक्षण करणे, हे लोकजीवन शास्त्रीय पुरातत्वाचे स्वरुप आहे.
होळी आणि गणपतीसाठी कोकणवासी ट्रेन, विमान, एस.टी., खाजगी बस किंवा खाजगी गाड्यांनी भरभरून गाव गाठतात. कोकणी माणसाच्या लोकजीवन शास्त्रातील या एका छोट्याशा परंपरागत धार्मिक व सांस्कृतिक प्रेरणेतून, ऋग्वेदातील श्लोकांचा आधार घेवून, आस्को पारपोला यांच्या पुस्तकातील फाल्गुन महिन्यातील अवीर संज्ञेच्या आधारे आणि तर्काचा वापर करून प्राचीन पुरातत्व जाणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
Leave a Reply