इवलेसे रोप लावियले दारी …

सिंधु नदीच्या काठावर वसलेल्या मोहेंजोडदो आणि हडप्पा येथील उत्खननात भारतीय पुरातत्व खात्याला पाच एक हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचा शोध लागल्याचे सन १९२४ मध्ये जाहीर झाले. ही भारताच्या सांस्कृतिक वारशाला मिळालेली एक कलाटणी होती.

मुघल आणि इंग्रज यांच्या दास्याच जोखड आठशे वर्ष मानेवर ठेवून भारत पारतंत्र्याच ओझ वाहत होता. ब्रिटिशांना ख्रिस्तपूर्व इतिहासाच फारच अप्रूप होतं. भारताचा इतिहास ते इथल्या बुद्ध व जैन परंपरांमुळे फारतर ख्रिस्तपूर्व पाचशे वर्षांपर्यंत तर वेदादी ग्रंथांमुळे ख्रिस्तपूर्व १५०० पर्यंत समजत होते. त्यामुळे ख्रिस्तपूर्व २५००-३००० वर्षांपूर्वीच्या सिंधु संस्कृतीचा शोध हा ब्रिटिशांना ही एक धक्का होता. तर भारतीयांसाठी तो गुलामीच्या जखमांवर आत्मशोधाच्या शीतल मलमासारखा दिलासा देणारा होता. प्रेरणादायी होता.

नैऋत्य आशियामधील टायग्रीस आणि युफ्रेटीस या नद्यांमधल्या तत्कालीन मेसोपोटेमियाच्या मैदानी प्रदेशाला जागतिक संस्कृतीच माहेर घर मानल जातं. जेथे सध्याचा इराक, सिरिया, तुर्कीये, इराण आणि कुवेत हे देश वसले आहेत. तेथील सुमेरियन, अक्कड, बॅबिलोनीयन आणि असिरियन या राज्यांना आणि संस्कृतीला जगाच्या प्राचीन इतिहासात मानाचं स्थान होत.

सिंधु संस्कृतीच्या शहरांतील अवशेषांत आणि मेसोपोटेमिया येथील अवशेषांत कमालीचे सांस्कृतिक साम्य आहे. यास्तव सिंधु संस्कृती विषयी देखील कुतूहल जगभरातील अभ्यासकांना वाटू लागलं.

मोंहेंजोडदो आणि हडप्पा येथील उत्खननानंतर आजवर हजारो उत्खननांमध्ये सिंधु संस्कृती कालीन शहरे सापडली आहेत. अफगाणिस्तानात १, पाकिस्तानात १३ तर भारतातील जम्मूमध्ये १, पंजाबमध्ये १, पश्चिम उत्तर प्रदेशात ६, हरयाणामध्ये ११, राजस्थानात ३, गुजरातमध्ये २५ तर महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील दायमाबाद येथे १ ही वानगीदाखल प्रमुख शहरे होत.

राकट, कणखर, दगडांचा देश असलेल्या महाराष्ट्रात दायमाबाद आणि इनामगाव येथील उत्खनने सोडल्यास भारतीय पुरातत्व खात्याला फारसे यश आलेले दिसत नाही.

सिंधु संस्कृतीच्या प्रदेशात तत्कालीन भारतीय पुरातत्व खात्याचे प्रमुख सर जॉन मार्शल यांना बृहूई ही द्रविडी भाषेची बोली असलेली भाषा बोलणारे लोक आढळले. यास्तव त्यांनी सिंधु संस्कृतीच्या भाळी द्रविडी टिळा लावला. त्यानंतर अनेक संशोधकांनी तेथील आजतागायत न उलगडलेल्या लिपीची उकल द्रविडी भाषेच्या सहाय्याने करण्याचा प्रयत्न केला. परंतु शतकभराचा अवधी होऊनही सिंधु संस्कृती ही द्रविडी असल्याचे पुरावे सापडले नाहीत.

निव्वळ बृहुई या द्रविडी भाषेच्या बोलीवरून सिंधु संस्कृतीला द्रविडी मानणं, हा खरंतर महाराष्ट्रावर अन्याय होता. कारण सिंधु नदीच्या तीरावर बोलल्या जाणाऱ्या दार्दीक भाषेचे दुसरे नाव पिशाचा असून ती तीन हजार वर्षांहून अधिक जुनी असलेली महाराष्ट्री भाषेची बोली भाषा पैशाची होय.

सिंधु संस्कृती आणि तळ कोकण यांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे तेथील व्रात्य तत्वज्ञान होय. व्रात्य या शब्दाचा अर्थ खोडकर असा भासत असला, तरी व्रात्य म्हणजे योग शास्त्रातील वृत्ती होय. सिंधु संस्कृती आणि तळ कोकणातील संस्कृती ही महाराष्ट्र धर्मीय योग संस्कृती आहे.

कोकणात जसे गावाच्या मध्यभागी लिंग योनी असलेल शंकराच मंदीर आढळत. अगदी तशी हजारो लिंग आणि योनीचे अवशेष सिंधु संस्कृतीकालीन शहरांतील उत्खननात सापडले आहेत.

महाराष्ट्र धर्मातून सिंधु संस्कृतीचे इवलेसे रोप तळकोकणाच्या दारी तिथल्या सप्तर्षींनी लावले आणि तयाचा वेलू हा भारताची पश्चिमेकडची राज्ये, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि मध्यपूर्वे वरी जाऊन पोहोचला.

या विषयीच प्रतिपादन अनेक लोकजीवनशास्त्रीय पुरातत्व (Ethno-archeology) शास्त्राच्या आधारे मी माझ्या ‘सिंधु संस्कृती आणि महाराष्ट्र’ या पुस्तकात केले आहे.

साधारण सहा सात हजार वर्षांपूर्वी तळकोकणातील समृद्ध अशा संस्कृतीचा मोगरा हा असा फुलला आणि त्याचा सांस्कृतिक दरवळ जगभर पसरला.

Comments

Leave a Reply

Discover more from Swastika Dharma

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading