जगावं की मरावं, हा एकच सवाल आहे …

मी भल्या पहाटे उठुनी
दवबिंदु शितल प्यालो ।
केसरी रवीचे वस्त्र
मी अंगावरती ल्यालो ।।
मंदिरी वाजली घंटा
मनी तृप्त होऊनी गेलो ।
देवाच्या पायापाशी
मन रिते करुनि आलो ।।

घाईघाईत वहीत या ओळी प्रसन्न चित्ताने खरडल्या आणि कामाला निघालो.

कामे एखाद्या भूतासारखी मानगुटीवर बसली होती. मनात कामांची यादी आ वासून उभी होती. सगळी कामे मलाच करायची होती. देवबिव कोणी मदतीला येणार नव्हता. लगबगीने मिळेल ते कपडे घालून महानगरपालिकेने जलपुरवठा केलेल्या नळातून माठात भरलेलं पाणी बाटलीत भरून मी कामाला निघालो.

ग्रीक तत्वज्ञ ऍरिस्टॉटल यांनी माणसाला समुहप्रिय प्राणी म्हटले. त्यांच्या मते माणूस त्याच्या भोवतालच्या समुहात वावरतो आणि बहरतो.

माणुस हा त्याच्या समुहातील भाषा, संस्कृती, धर्म, मानसशास्त्र, आरोग्य, अर्थकारण, समाज माध्यमे, राजकारण इत्यादिंच्या संस्कारांच्या मर्यादेमध्ये भौगोलिक व नैसर्गिक अनुरुप परिस्थितीत वावरत असतो.

परंपरेतून त्याला त्याची भाषा, त्याचा धर्म आणि त्याची संस्कृती प्राप्त होते.

मुंबईत रहाणार्‍या माणसाला महानगरपालिकेच्या नळयोजनेतील पाणी मिळते. सरकार उपलब्ध करून देईल ती आरोग्यसेवा आणि लस मिळते. शेतकरी वापरतील ती खते मिश्रित आणि सरकार पुरवठा करील ती अन्नधान्य मिळतात. दुग्धव्यवसायिक देतील ती स्निग्धता वा रसायनांच दुध मिळते. वाण सामान, कपडे, साबण, स्वैपाकाची भांडी, गृह सजावटीचे सामान, वाहने सर्व काही उत्पादक उपलब्ध करून देतात, ते आपल्या खिशातील पैसे मोजून आपल्या मिळते. आपले मानसशास्त्र, आपल्या आवडीनिवडी हे सर्व काही समाजमाध्यमे घडवीत असतात. आपलं अर्थकारण, समाजकारण हे सगळं राजकारण घडवित असते.

थोडक्यात मर्यादित ईच्छाशक्ती सोडली तर माणसानेचं निवडलेल्या राजकीय व्यवस्थेचा माणूस हा गुलाम असतो.

माणसाने निवडलेल्या या व्यवस्थेपलिकडे एक व्यवस्था असते. ती म्हणजे निसर्ग व्यवस्था. आपण निवडलेली मानवी व्यवस्था या निसर्ग व्यवस्थेलाही आपल्या ताब्यात ठेवण्याचा असंभव प्रयत्न करीत असते.

चार्लस डार्विन (१८०९-१८८२) हा इंग्रज निसर्गवेत्ता (Naturalist) होऊन गेला. त्याने त्याच्या वयाच्या २७ ते ३३ वर्षांपर्यंत ५ वर्षे एच. एम. एस. बीगल या बोटीतून जगभर प्रवास करून निसर्गातील सर्व दृष्टीगोचर प्राण्यांचे नमुने गोळा केले. या सर्व प्राण्यांच्या नमुन्यांचा अभ्यास केल्यावर सन १८५९ साली त्यांनी नैसर्गिक निवड (Natural Selection) हा “जो सक्षम असेल, तोच जगणार” (Survival of the Fittest) हा उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला.

याचं उत्क्रांतीच्या तत्वावर निसर्ग हा जगणार्‍या जीवांची निवड करीत असतो. ज्याची निवड होत नाही, तो जीव पृथ्वीतलावरून नष्ट होतो.

हे निसर्गतत्व म्हणजे “जगावं की मरावं हा एकच सवाल आहे !” असा प्रश्न विचारणार्‍या कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राट या प्रसिध्द नाटकातील स्वगतासारखा आहे.

हाच प्रश्न चारशे वर्षे आधी जगविख्यात लेखक शेक्सपियर यांनी त्यांच्या हॅम्लेट या नाटकातील राजपुत्र हॅम्लेट याच्या मुखातून वदलेल्या “To be or not to be that is the question” या स्वगतातून मांडला होता.

“जगावं की मरावं” या पर्यायांच्या मधोमध निसर्गव्यवस्थेतील पूर्ण उष्मा (Enthalpy) दडलेला आहे. या पूर्ण उष्म्यातून उष्मा अनियमित पध्दतीने वाढला (Entropy) तर निसर्गव्यवस्थेचा तोल ढासळू लागतो आणि निसर्ग मरावचं (Extinction) बटण दाबतो. अनियमित उष्मा जर नियंत्रणात राहिला वा कमी झाला तर पृथ्वी ही जगण्याचं (Survival) बटण दाबते. हळुवारपणे चालणारी ही प्रक्रिया संतत चालत असते.

“जगावं की मरावं” या दोलायमान निसर्ग व्यवस्थेतील माणूस हा खरी चेतना हरवलेला खोट्या चेतनेचा आवं आणलेला प्राणी (Zombie) आहे.

निसर्ग ठरवेल तसे वागणारा, निसर्ग ठरविल तशी राजकीय, धार्मिक, आर्थिक, आरोग्य, सांस्कृतिक, मानसिक, समाज-माध्यमांची व्यवस्था निवडणारा.

सरते शेवटी हेच म्हणाव लागेल की कवी कल्पनेच्या पलिकडे मनुष्याचं एक मर्यादित इच्छेचं वास्तविक जग आहे आणि त्या वास्तविक जगाच्या पलिकडे निसर्ग भानाचं एक अदृष्य द्विपर्यायी जग आहे. ज्याचा एकच सवाल आहे …

“जगावं की मरावं”

Comments

Leave a Reply

Discover more from Swastika Dharma

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading